Tuesday, March 23, 2010

सुमनताई

कॉलेजमधुन घरी आलो होतो. घरात पाऊल ठेवतो न ठेवतोच तर बाबा फोनवर कुणाबरोबर तरी मोठ्याने बोलत होते ते कानावर पडले. "देवानं तुम्हाला अकला दिल्या नाहीत कारे. सोन्यासारख्या पोरीचा जीव घेतला तुम्ही. काय कमी केलं रे तुमच्यासाठी तिने. शेतात गुरासारखी कामं केली ना तीने... घरात मोलकरणीसारखी राबवून घेतलीच ना.. त्यात तुम्हाला तीची काळजी घेता नाही आली...." आई पलंगावर डोक्याला हात लावून बसलेली. मला काय झालं ते कळेना. आईला हात लावुन विचारलं "काय झालं..?". ’सुमन... सुमन गेली’. आई एवढचं बोलुन डोळे पुसत किचन मध्ये गेली. ते ऎकुन मी पुर्ण बिथरलोच.

मोठ्या काकांची मुलगी सुमन माझ्यापेक्षा दोन वर्षानी मोठी होती. शाळेत धडपडत कशीतरी चौथीपर्यंत शिकली. काकांना दोन मुले आणि ही मुलगी मोठा मुलगा नाना घरातली कामे कमी आणि गावातलीच जास्त करायचा त्यात त्या बाप लेकाचे कधी जमायचं नाही. दुसरा सुदाम तो नाशिकला कामाला त्यामुळे राहायला तिथेच. घरात काका, काकी, आजोबा आणि सुमन. मोठ्या मुलाची शेतकामाला मदत मिळत नसल्यामुळे सुमनला घरातले आणि शेतातले काम करावे लागे. त्यात काकुची आजारपण सतत चालु. सुमनला काम करताना बघुन अचंबा वाटायाचा इतकी सगळी कामे ती एवढ्या जलदगतीने करत की तिला कामे सांगणारा थकुन जाईल पण ही नाही. नगर जिल्ह्यात नेहमीच दुष्काळ त्यात आमचे घर मळ्यात विहीरीचे पाणी आटले की गावात टॅंकर यायचा. तिथुन घरी पाणी आणायला लागायचे. पण सुमन ते कामही जिद्दीने करी. कुठल्या कामाला तिने कटांळून नाही म्हटले असे कधीच झाले नाही.

घरी जागरण-गोधळांचा कार्यक्रम होता. रात्री तो उरकला, दुसर्‍या दिवशी गावातल्या लोकांना बोलावुन जेवण द्यायचे होते. मुंबईहुन आम्ही सगळे तिकडे गेलेलो. नाशिकवरुन सुदामही आलेला. घरात पाच आत्याही आलेल्या त्यात त्यांची नवरे, पोरं आणि बाकिचे नातेवाईक. सगळं घर एस.टी. स्टॅंडसारखं फुलुन गेलेलं. एकीकडे सुमनचं जेवणाच्या पत्रावळ्या वाढायचा काम चालु. शिरा वाढायचं काम माझ्याकडे. भात आणि वरण एकाकडे असे करुन पगतींच्या पगंती उठत होत्या आणि सुमन न दमता पत्रावळ्या पसरत होती. मग कुणाला पाणी कुणाला पुर्‍या कुणाचं पोरगं खाद्यांला मारुन त्याला पावडर थापुन त्याला कपड्यात घालायच. पासुन ते गुरांनां चारा आजोबांना जेवण. कुणाला बिडी काडी लागली तीही दुकानातुन आणुन देत होती. ह्या सगळ्यातुन मी तीची काही कामे माझ्याकडे घेत. पण ती ऎकत नसे. ह्या गोधळांत कुणाचच तिच्याकडे लक्ष नसायचं. मग आई तिला थांबावायची " जेवलीस का गं.." असं दामटुन विचारायची. "जेवन मी मागाहुन.." असं म्हणत ती क्षणार्धात गायबही व्हायची. उंचीने पाच फुटाच्या आत कपडे म्हणजे काकूची किंवा आम्ही मुबईतुन तिच्यासाठी घेतलेल्या साडीपैकी एखादी साडी. ती पण व्यवस्थीत घातलेली नसे कशी तरी खोचुन द्यायची. सकाळी उठली की केस एकत्र करुन गाठ मारली आणि मशेरी दाताला फासली की आघोंळ करुन कामाला लागे. कामामुळे शिक्षण अर्ध्यावर सोडलं. अडाणीपणामुळे टापटीपपणा काय तो आला नाही.

आम्ही भावंड गावाला गेलो की तिच्याबरोबर खेळण्यात दिवस कसा जायचा ते कळत नसायचं. जेवण फटाफट बनवण्यात तिचा हात अजुन आमच्या घराण्यात कुणी धरू शकलेलं नाही. अवघ्या अर्ध्या तासात ती आठ-दहा माणसाचं जेवण तयार करीत असे. एकीकडे भाकर्‍या थाप. कालवणाला उकळी दे. शिरा, कुणाला पुर्‍या काय अन्‌ काय. आजपर्यंत खुप ठिकाणी मी लसणाची चटणी खाल्ली. पण सुमनने बनवलेल्या चटणीसमोर सगळ्याच फिक्या. गावात कोरडे वातावरण त्यामुळे दिवसातुन चारदा भुक लागायची. दुपारची जेवणं सकाळी अकरालाच व्हायची. मग परत दुपारी तिनला पोटात कावळे. अश्यावेळी शिळ्या भाकरीचे कोरके आणि सुमनच्या हातची लसणाची चटणी. मग मस्त गप्पा रंगायच्या. सुमन घरातलाच एखादा किस्सा सांगुन धम्माल उडवुन द्यायची. पकडा-पकडी, लपाछपी सारखे खेळ चालायचे. कधी ती घराबाजुच्या कडुनींबाच्या झाडावर चढुन आम्हाला झोका बांधुन देई. ते क्षण अनमोलच होते. दिवसामागुन दिवस जात राहिले आणि एके दिवशी सुमनच्या लग्नाची बातमी आमच्याकडे पोचली. बाभळेश्वरच्या आत्तेच्या मुलाबरोबर तिचं लग्न ठरवलं. ही गोष्ट काकांनी आम्हाला न विचारता ठरवली. आत्तेचा मुलगा अगदीच वाईट नव्हता पण कामधंद्याला अजुन लागायचा होता. तो शेतातली कामे करत नसे, त्यात घरातही छोटछोट्या भांडणावरुन भावंभावडांना मारहाण करत असायचा म्हणुन काळजी. पण आत्त्या चांगली होती. ती सुमनला सांभाळुन घेईल आणि लग्न झाल्यावर तोही सुधारेल असे समजुन आमच्या सुमनचे लग्न लागले. सुमनच्या लग्नात आमची परिक्षा असल्यामुळे जायला मिळाले नाही. आई-बाबा जावुन आले होते.

लग्नानंतर वर्षभरात आम्ही तिकडे गेलो. सासरीही सुमनला सदैव कामानेच व्याढलेले. तिला असं सतत काम करताना बघुन खुप वाईट वाटायचं पण आम्हा लहानाचं कोण ऎकणार म्हणुन गप्प असायचो. सासुचे सासर्‍याचे नवरयाचे करत राहिली. वर्षभरात पाळणा हललाही आणि मुलगी झाली. मुलगी झाली म्हणुन आत्तेच्या चेहर्‍यातली नाराजी तेव्हा लपली नाही. पण आता नाहीतर नंतरतरी मुलगा होईल ह्या आशेवर होती . परत दोन वर्षानी मुलगीच झाल्यावर मात्र सुमनचे तिकडे हाल होऊ लागले. सासुला नातवाचा हव्यास त्यात तिचा नवरा लग्नानंतरही सुधारला नाही. तिला मारहाण करत होता पण आमच्या कानावर त्यावेळी कधी पोचायचे नाही, एकदा समजले तेव्हा बाबा बाभळेश्वरला जाऊन आत्याला आणि आत्तेभावाला चांगलेच समजावुन आले होते. काकाला कधी पोरीची काळजी वाटली नाही. पोटची पोर म्हणुन एकदा तिला माहेरी आणली पण नातेवाईकात बोलणी सुरु झाल्यावर परत सासरी पाठवली. सुमनच्या नशीबी हाल कमी होण्याच्या मार्गावर नव्हते. दुसर्‍या मुलींनतरही सुमन दोन वर्षानी तिसर्‍यांदा बाळंत झाली. पण ह्या वेळी तिच्या बाळंतपणात कुणी काळजी घेतली नाही. माहेरी काकू एकटीच असल्याने तिची सगळी बाळतंपणं सासरीच झाली. आम्ही मुंबईत आणु म्हटलं तर एवढ्या लांब नको म्हणुन आत्तेची परवानगी नव्हती. तिसर्‍या बाळतंपणातही तीच्याकडुन घरची, शेतावरची सगळी कामे करुन घेत राहीले. नवर्‍याची साथ कधी लाभली नाही. दु:ख, यातना सहन करत राहिली. डिलीव्हरीच्या वेळी मात्र ह्या सगळ्या फरफट्यातुन सुटली. कायमची. देवाने तिची सुटका केली तिला आपल्याकडे बोलावुन. ह्यावेळीही तिला मुलगीच झाली. मु्लीला जन्म दिला पण सुमन जीवंत राहिली नाही. ह्या मुलीला तिच्या सासर्‍यांनी आपलेसे केले नाही. काकांच्या मोठ्या सुनेने तिला आपल्याकडे ठेवली. आज तिला मुलीसारखी संभाळतही आहे. वहिनीला दोन मुले आहेत पण मुलगी नव्हती.

सुमनच्या जाण्याची बातमी कळाल्यावर खुप त्रास झाला रात्र रडुन काढली पण त्याचा काही उपयोग नव्हता. आम्हा भावंडावर तिने केलेली माया अफाट होती. आमच्या चेहर्‍याकडे बघुन तिला आमच्या भुकेचा अंदाज यायचा. "देऊ का काही खायला..?" असा तिने विचारलेला मायाळु प्रश्न आजही आठवतो. तिला जाऊन दहा-बारा वर्षे झाली असतील. पण आजही माझ्या शरिरातील एक कोपरा तिच्या हातची चटणी खाण्यासाठी उपाशीच आहे असे वाटते.

15 comments:

Anonymous said...

मनाला चटका लावून गेला रे लेख.....

गेल्या सुट्टीत घरी गेले होते ना, केव्हातरी आई अचानक बोलली रे, "माझ्या आयूष्याचे काय जन्माला आला हेला काम करत गेला!!!" तुला सांगते दीपक, खूप सुखी कुटूंब आहे रे आमचे पण तरिही आईची पण एक बाजू आहे, काही स्वत:ची व्यथाही आहे हे जे त्या दिवशी जाणवले त्याची आठवण झाली बघ!!!

सुन्न व्हायला झालेय बघ!!!

आनंद पत्रे said...

एखाद्याच्या नशिबात असे का व्हावे, देव खरंच काही पहातो का ?

हेरंब said...

:( .. बिचारी दुर्दैवी !! काय लिहू दीपक? काळजाला हात घातलास.

Anuja said...

खूपच छान, सहाच आणि सोप्या शब्दात बराच काही सांगून गेला हा तुझा लेख

अपर्णा said...

दीपक अरे फ़ार चटका लावुन गेली ही तुझी ही कथा (की खरी कहाणी) आणि अशीच सारखी कामं करत राहणारी माझी एक मावशी फ़ार आठवली....आता नाहीये ती...

सागर said...

:( मी पण पहिली आहे रे अशी सुमनताई..वाईट वाटत..

Unknown said...

खुपच छान ...

शिनु said...

खुपच टची झालिय कथा (?) आमच्या शेजारी एक राणीताई रहायची तिचीआठवण झाली.

शिनु said...

ब्लॉगचं रूपडं खुपच सुंदर आहे. डोळ्यांना थंडावा देणारा लेआऊट आहे. खुप छान वाटलं ब्लॉगला भेट देऊन.

priyanka said...

Khup chan lekh aahe re tujha kharach dolyat pani ala.. rojchya jivnat ashya kiti tari suman tai apan baghto na pan kahich karu shakt nahi tyanchyasathi hyach vait vatat.. :( baki lekh khupach chan jhalay as usual

shashankk said...

priya deepak,
Sumantainsarakhya asha anekjani ya samajyat aahet, tyanchya yvatha ashach rahanar ase vatate. Tumhi khoop samvedansheel asalyanech ekdam sundarpane tipale ahe.
Apratim lekhabaddal dhanyavad.
shashank

Awantika said...

Khup touching n tyat ti real story tu mala aadhi sangitaleli n ti atta lekhachya rupat vachali..pan donhihi veles manala khup chatka laun gelay...pan likhanachi shailihi mast aahe...

Prasaadik said...

simply gr8!

Suhas Diwakar Zele said...

अरे ही कथा मी दुसऱ्या ब्लॉगवर वाचली होती आणि तिथे कमेंट दिली होती :(

एकदम सुन्न झालं रे वाचून, शब्दच सुचत नाही आहेत...मस्त लिहिलंयस

Nilima@27 said...

खुप छान आहे..मन सुन्न करून टाकणारी कथा आहे..

उत्तम शब्दरचनेवर अख्खी कथा एकवटून उभी राहिली आहे..
लिहीत राहा..
खुप शुभेच्छा..

Post a Comment