Sep 25, 2023

सगळं करुन टाका डिलीट

यंग ऍण्ड एनर्जेटिक.. रहायला तर हवं...पण कसं? भारंभार क्रीम चोपडलं,हजारदा केल्या पार्लरच्या वार्‍या तरी वयाच्या सुरकुत्या कधी ना कधी चेहर्‍यावर चढणारच ना? कितीही घातले ट्रेण्डी कपडे आणि वापरल्या कार्गो पॅण्टस तरी लागतेच ना धाप चार जिने चढल्यावर? ट्रेकिंगसाठी तुडवलेल्या वाटा आता दमछाक करवतातच...

प्रश्न करायचं काय?..........करता येईल खरं तर............

तुमच्या मोबाईल मध्ये वर्षानुवर्षे सेव्ह केलेले काही नंबर्स आहेत? काही मेसेजेस? ताबडतोब डिलीट करुन टाका.

जे मोबाईलचं तेच डोक्याचं. जुन्या तारखा , जुनी भांडणं , कधी काळी कमी असलेल्या वजनाचे आकडे, कुणाला कोणत्या तारखेला भेटलो ते तपशील काढुन टाका डोक्यातुन हे सारं कोंबलेलं. बघा ..... हलकं वाटेल. नवं काही सेव्ह करायचं तुमच्या मेमरी मध्ये तर स्पेस नको तयार करायला? अपडेट करा तुमची सिस्टिम!!!!!

कोणाशी मैत्री आहे तुमची? जे सारखे किरकिर करतात? त्यांना जगण्यात रस वाटत नाही ? सतत उदासवाणी रडगाणी गातात? आपलं काहीच कसं खरं नाही , सगळं जगच कसं वाईट आहे. लोक कसे वाईट्ट आहेत , आपल्या वाईटावर टपले आहेत अशी सतत भुणभुण करतात तुमच्या डोक्याशी? ताबडतोब मैत्री तोडुन टाका त्यांच्याशी. असे उदास जंतु तुमचं आयुष्य कुजवुन टाकतात. त्यापेक्षा भरभरुन आनंदी जगणार्‍याम्च्या सहवासात रहा. आनंदी रहा... आणि हो तुम्ही कोणत्या गटात येता? ते पण एकदा तपासुन पहा.

शिकत रहा. मजा येते शिकताना. काय वाट्टेल ते शिका. तुम्हाला येत नसलेली अगदी लहानात लहान गोष्ट शिका, मेंदुवर गंज चढु देऊ नका. मेंदुला सतत उद्योग असलेला बरा. तो खुष, आपण खुष. रिकामं डोकं भुताचं घर असतं माहितेय ना? मेंदुला काम दिल की तो रंग भरायला लागतो.

तुम्हाला पाणी पुरी खायला आवडते? भेळ? लालचुटुक बर्फाचा गोळा? बुढ्ढी के बाल खाताना अजुनही मजा येते? मग करा ना ते !!!!! अगदी लहान छोट्यात छोटी गोष्ट करायला आवडत असेल ते मनापासुन करा. मजा येईल. आपण मोठ्ठे झालो , आता अमुक तमुक करणं बरं दिसेल का असा फालतु विचार आजिबात करायचा नाही. मनापासुन हसा. हसत रहा. ज्यांच्याबरोबर राहुन तुम्हाला हसावसं वाटतं त्यांच्याबरोबर रहा. इतरांना हसवा,दिलखुलास हसा. दिवसातुन एकदा तरी.......!!!!!!!!

त्रास होतोच ना..! माणसांचा होतो घटनांचा होतो, शब्दांचाही होतो. पण त्रास झाला की सोडुन द्यायचं. उगीच मन कुरतडत बसायचं नाही. ज्याने त्रास दिला तो एकदाच दिलेला असतो; पण ते सतत आठवुन स्वताचा त्रास वाढवायचा, वागवायचा. त्या त्रासाच्या आणि चिडचिडीच्या ओझ्याने आपलं जगणं गुदमरतं. "गेला उडत" असा बेदरकारपणा इथे वापरायला हरकत नाही.

काय मनापासून आवडते तुम्हाला? यादी करा आणि जीव लावून ते करा. आवडतो का तुम्हाला हिमेश रेशमिया ? मग लोक काही का म्हणेनात ऐका न त्याची गाणी ! आवडतात का तुम्हाला चित्र काढायला ? मग चित्र काढा. तुम्ही महान चित्रकार नाही होणार. पण चित्र तर काढा !

मनात काही सलतयं का ? डोळ्यात येतय उगाच पाणी ? कसली तरी लागलीय बोचणी? मग बोलून टाका. काढून टाका तो गिल्ट मनातून . मागायची का कोणाची माफ़ी ? आजच मागा. छान हलके वाटेल मनात. कसलीही गिल्ट घेउन जगु नका..... कशाला छाळायचं उगीच स्वत:ला ?

प्रेमांच्या माणसांशी बोलून किती दिवस झाले?
" तुला ती साडी छान दिसते ! ही नको तीच साडी नेस" आसा आग्रह आईला कधी केला होता? बाबांच्या मित्राच्या तब्बेतीची चौकशी कधी केली, आठवतयं? करा. ज्यांच्यावर तुमचे प्रेम आहे त्याना ते जाणवू द्या.
"आय लव्ह यु" म्हणणे सोपे असते म्हणून तर पहा. आणि नसेलच म्हणायचे तर द्या हातात हात..... तो ही पुरेसा बोलका आसतो.....

तुमचे घर वाट पाहत तुमची, तिथल्या भिंती, पडदे, खिडक्याच नाही तर भांडीकुंडीही तुमच्या साठी आतुर आसतात. घरी परता. घरात रहा. घराचे होटेल झाले माणसांची मुळं तुटतात ....
घरट्यातल्या उबेला विसरु नका.... जगण्यातली उर्जा तिथूनच येते......

Apr 5, 2011

जग जिंकताना....

करोडो भारतीयांचे स्वप्न २०११ चा विश्वचषक भारतीय सघांने जिंकावा हे स्वप्न घेऊन विश्वचषक स्पर्धेत १९ फेब्रुवारीला भारतीय टिम बांग्लादेशविरुद्ध मैदानात उतरली. सेहवागच्या धडाकेबाज दिडशतकाने भारतीय संघांने बांग्लादेशविरुद्ध ३७० धावा कुटल्या. बांग्लादेशनेही २८३ धावापर्यंत मजल मारली. भारतीय संघाने ही मॅच ८७ धावांनी जिंकली पण चांगल्या गोलंदाजाची उणिव तेव्हाही भासली. इंग्लडविरुद्धच्या सामन्यात केलेल्या ३३८ धावाही कमी पडल्या. भारतीय गोलंदाजांना इंग्लडला ३३८ धावा करण्यापासुन थांबवता आले नाही. सामना बरोबरीत सुटला. गोलंदाजाबरोबर भारतीय संघाचे क्षेत्ररक्षण हीही एक समस्या होतीच. भारतीय बलाढ्य फलदांजीला द्रुष्ट लागली ती आर्यलंडविरुद्धच्या सामन्यात. आयरीश संघाने केलेल्या २०७ धावांचा पाठलाग करताना भारतीय संघाला ५ विकेट गमवावे लागलेच पण ४६व्या षटकापर्यंत वाट बघावी लागली. नेदरलॅंडविरुद्धच्या सामन्यातही १८९ धावा करताना भारतीय संघाचा अर्धा चमू नेदरलॅंडसने परत पाठवला होता.

गोलंदाजाबरोबर फलंदाजीची ही स्थिती पाहता सचीन सोबत भारतीय संघाने विश्वचषक जिंकण्याचे उराशी बाळगलेले स्वप्न खरं होइल का? हा प्रश्नच होता. ह्या प्रश्नाला पराभावाचे उत्तर मिळाले दक्षिण आफ्रिकाविरुद्धच्या सामन्यात. भारतीय सघांचे सर्व फलंदाज ५० ओव्हरही खेळू शकले नाहीत. ४८.४ ओव्हरमध्येच सर्व संघ तंबूत परतला. बोर्डावर २९६ ही धावसंख्या होती पण आफ्रिकेच्या चिवट फलंदाजानी ते आव्हान २ चेंडू आणि ३ गडी राखुन पार केले. नेहरा आणि पटेलच्या गोलंदाजीची पिसे काढली गेली. शेवटचे षटक नेहमी घात करणार्‍या नेहराला का दिले गेले ही टीकाही कॅप्टन धोनीवर झाली. खरं सांगायचं तर त्यावेळी हा संघ उपांत्यफेरीतही पोहचेल की नाही ही भिती मनात घर करुन बसली.

आफ्रिकविरुद्धच्या पराभावानंतर मात्र भारतीय संघ बरच काही शिकला. रणनीत्या बदलल्या गेल्या. वेस्ट इंडीजला ८० धावाने पराभुत करताना भारतीय संघाची गोलंदाजी छानच झाली. ४२ ओव्हरमध्ये वेस्ट इंडीजच्या संपुर्ण संघाला मैदानाबाहेर पाठवले. हा सामना टिम ब्लू ने दिमाखात जिंकला. ह्या सामन्यानंतरचा दिसलेला भारतीय संघ जबरदस्त आत्मविश्वासाने खेळला. उंपात्य फेरीत कांगारु विरुद्धचा सामना. गेली ३ वर्ल्डकपचा दावेदार असलेल्या कांगारुंना ५ विकेटने धोबीपछाड दिल्यावर पॉण्टींग चा चेहरा बघण्यालायक झाला होता. युवीचा जल्लोष आणि पॉण्टींगची शरणागती ह्या चित्रात अख्या जगाने डोळे भरुन पाहिली. माजोरड्या आष्ट्रेलियाचा केलेला पराभव ही भारतीयांसाठी अत्यंत आनंदाची बाब होती. भारतीय संघावर इथे स्तुतीसुमनाचा वर्षाव झाला. पण त्यावरही कळस चढवला गेला जेव्हा भारताने पारंपारीक प्रतीस्पर्धी पाकिस्तानला घराचा आहेर दिला. भारत-पाक ह्या सामन्याला नेहमीप्रमाणे महायुद्धाचे स्वरुप आले होते आणि मोहालीच्या स्टेडीयमला रणांगणाचे. भारतीय संघाने केलेल्या २६० धावा आणि त्याला प्रत्युत्तर देताना पाक संघाची दमछाक झाली. अकमलने काही शॉट्स मारुन पाकिस्तानला विजयाची आशा दाखवली. पण भज्जीने त्याला परत धाडले आणि नंतर रांगच लागली. मिसबाहने शेवटच्या काही षटकात वैतागुन हाणलेले चौकारही भारतीय संघाला विजयापासुन रोखु शकले नाहीत. त्यादिवशी भारतभर दिवाळी साजरी झाली. भारत फायनला पोचला होता.

फायनलमध्ये भारतासमोर ताकदवान लंका. भारतीय संघ विश्वचषकापासुन एक सामना दुर. ह्यावेळीही २००३ च्या फायनलची पुनरावृत्ती होणार? फायनलपर्यंत उत्तम खेळ दाखवुन फायनला हरणार..? लाखो- करोडों भारतीयांचे स्वप्ने खरी होतील का भारतीय संघ परत माती खाणार..? असे बरेच प्रश्न.. लकेंनी प्रथम फलंदाजी केली. सुरुवातीच्या काही षटकात भारतीय गोलंदाज आणि क्षेत्ररक्षांनी केलेल्या चांगल्या कामगीरीला उत्तरार्धात गळती लागली. २०० पर्यंत पोहचु शकेल की नाही असा लंकेचा सघं जयवर्धनेच्या नाबाद शतकाने २७४ ह्या समाधनकारक धावसंख्येवर पोचला. टिम इंडियाची फलदांजी आणि ३१ धावात सेहवाग आणि सचिन तंबुत परत. पण नंतर आलेल्या गंभीर आणि विराटने केलेल्या भागीदारीने भारतीयांचा आशा पल्लवीत केल्या. कोहली गेल्यांनतर आलेल्या धोनीने मात्र केलेला खेळ आत्ताही त्याला सलाम ठोकावा असाच होता. गभींरचे शतक हुकल्यानंतर आलेल्या युवराजच्या साथीने धोनीने संघाला विजयापर्यंत पोहचवले. आणि एक षटक शिल्लक आणि ४ धावांची गरज असताना धोनीने ठोकलेल्या षटकाराने इतीहासात भारताच्या विश्वविजयाची नोंद झाली. तीन दिवसात परत दिवाळी साजरी झाली. धोनी, युवी, हरभजन आणि सचीनच्या डोळ्यातले आनंदाश्रू सर्वांनी पाहीले. भारतीय संघाने हा चषक सचिनला आणि क्रिकेटवेड्या देशाला अर्पण केला. सचिनला युसुफ पठाणने खांद्यावर बसवुन मैदानात मिरवणुक काढली गेली. त्यावेळी सचिनच्या चेहर्‍यावरचे भाव आजही डोळ्यासमोर आहेत. पुढील चार वर्ष भारतीय संघ क्रिकेटजगतात राज करणार होते . जग जिंकले होते...

Mar 23, 2010

सुमनताई

कॉलेजमधुन घरी आलो होतो. घरात पाऊल ठेवतो न ठेवतोच तर बाबा फोनवर कुणाबरोबर तरी मोठ्याने बोलत होते ते कानावर पडले. "देवानं तुम्हाला अकला दिल्या नाहीत कारे. सोन्यासारख्या पोरीचा जीव घेतला तुम्ही. काय कमी केलं रे तुमच्यासाठी तिने. शेतात गुरासारखी कामं केली ना तीने... घरात मोलकरणीसारखी राबवून घेतलीच ना.. त्यात तुम्हाला तीची काळजी घेता नाही आली...." आई पलंगावर डोक्याला हात लावून बसलेली. मला काय झालं ते कळेना. आईला हात लावुन विचारलं "काय झालं..?". ’सुमन... सुमन गेली’. आई एवढचं बोलुन डोळे पुसत किचन मध्ये गेली. ते ऎकुन मी पुर्ण बिथरलोच.

मोठ्या काकांची मुलगी सुमन माझ्यापेक्षा दोन वर्षानी मोठी होती. शाळेत धडपडत कशीतरी चौथीपर्यंत शिकली. काकांना दोन मुले आणि ही मुलगी मोठा मुलगा नाना घरातली कामे कमी आणि गावातलीच जास्त करायचा त्यात त्या बाप लेकाचे कधी जमायचं नाही. दुसरा सुदाम तो नाशिकला कामाला त्यामुळे राहायला तिथेच. घरात काका, काकी, आजोबा आणि सुमन. मोठ्या मुलाची शेतकामाला मदत मिळत नसल्यामुळे सुमनला घरातले आणि शेतातले काम करावे लागे. त्यात काकुची आजारपण सतत चालु. सुमनला काम करताना बघुन अचंबा वाटायाचा इतकी सगळी कामे ती एवढ्या जलदगतीने करत की तिला कामे सांगणारा थकुन जाईल पण ही नाही. नगर जिल्ह्यात नेहमीच दुष्काळ त्यात आमचे घर मळ्यात विहीरीचे पाणी आटले की गावात टॅंकर यायचा. तिथुन घरी पाणी आणायला लागायचे. पण सुमन ते कामही जिद्दीने करी. कुठल्या कामाला तिने कटांळून नाही म्हटले असे कधीच झाले नाही.

घरी जागरण-गोधळांचा कार्यक्रम होता. रात्री तो उरकला, दुसर्‍या दिवशी गावातल्या लोकांना बोलावुन जेवण द्यायचे होते. मुंबईहुन आम्ही सगळे तिकडे गेलेलो. नाशिकवरुन सुदामही आलेला. घरात पाच आत्याही आलेल्या त्यात त्यांची नवरे, पोरं आणि बाकिचे नातेवाईक. सगळं घर एस.टी. स्टॅंडसारखं फुलुन गेलेलं. एकीकडे सुमनचं जेवणाच्या पत्रावळ्या वाढायचा काम चालु. शिरा वाढायचं काम माझ्याकडे. भात आणि वरण एकाकडे असे करुन पगतींच्या पगंती उठत होत्या आणि सुमन न दमता पत्रावळ्या पसरत होती. मग कुणाला पाणी कुणाला पुर्‍या कुणाचं पोरगं खाद्यांला मारुन त्याला पावडर थापुन त्याला कपड्यात घालायच. पासुन ते गुरांनां चारा आजोबांना जेवण. कुणाला बिडी काडी लागली तीही दुकानातुन आणुन देत होती. ह्या सगळ्यातुन मी तीची काही कामे माझ्याकडे घेत. पण ती ऎकत नसे. ह्या गोधळांत कुणाचच तिच्याकडे लक्ष नसायचं. मग आई तिला थांबावायची " जेवलीस का गं.." असं दामटुन विचारायची. "जेवन मी मागाहुन.." असं म्हणत ती क्षणार्धात गायबही व्हायची. उंचीने पाच फुटाच्या आत कपडे म्हणजे काकूची किंवा आम्ही मुबईतुन तिच्यासाठी घेतलेल्या साडीपैकी एखादी साडी. ती पण व्यवस्थीत घातलेली नसे कशी तरी खोचुन द्यायची. सकाळी उठली की केस एकत्र करुन गाठ मारली आणि मशेरी दाताला फासली की आघोंळ करुन कामाला लागे. कामामुळे शिक्षण अर्ध्यावर सोडलं. अडाणीपणामुळे टापटीपपणा काय तो आला नाही.

आम्ही भावंड गावाला गेलो की तिच्याबरोबर खेळण्यात दिवस कसा जायचा ते कळत नसायचं. जेवण फटाफट बनवण्यात तिचा हात अजुन आमच्या घराण्यात कुणी धरू शकलेलं नाही. अवघ्या अर्ध्या तासात ती आठ-दहा माणसाचं जेवण तयार करीत असे. एकीकडे भाकर्‍या थाप. कालवणाला उकळी दे. शिरा, कुणाला पुर्‍या काय अन्‌ काय. आजपर्यंत खुप ठिकाणी मी लसणाची चटणी खाल्ली. पण सुमनने बनवलेल्या चटणीसमोर सगळ्याच फिक्या. गावात कोरडे वातावरण त्यामुळे दिवसातुन चारदा भुक लागायची. दुपारची जेवणं सकाळी अकरालाच व्हायची. मग परत दुपारी तिनला पोटात कावळे. अश्यावेळी शिळ्या भाकरीचे कोरके आणि सुमनच्या हातची लसणाची चटणी. मग मस्त गप्पा रंगायच्या. सुमन घरातलाच एखादा किस्सा सांगुन धम्माल उडवुन द्यायची. पकडा-पकडी, लपाछपी सारखे खेळ चालायचे. कधी ती घराबाजुच्या कडुनींबाच्या झाडावर चढुन आम्हाला झोका बांधुन देई. ते क्षण अनमोलच होते. दिवसामागुन दिवस जात राहिले आणि एके दिवशी सुमनच्या लग्नाची बातमी आमच्याकडे पोचली. बाभळेश्वरच्या आत्तेच्या मुलाबरोबर तिचं लग्न ठरवलं. ही गोष्ट काकांनी आम्हाला न विचारता ठरवली. आत्तेचा मुलगा अगदीच वाईट नव्हता पण कामधंद्याला अजुन लागायचा होता. तो शेतातली कामे करत नसे, त्यात घरातही छोटछोट्या भांडणावरुन भावंभावडांना मारहाण करत असायचा म्हणुन काळजी. पण आत्त्या चांगली होती. ती सुमनला सांभाळुन घेईल आणि लग्न झाल्यावर तोही सुधारेल असे समजुन आमच्या सुमनचे लग्न लागले. सुमनच्या लग्नात आमची परिक्षा असल्यामुळे जायला मिळाले नाही. आई-बाबा जावुन आले होते.

लग्नानंतर वर्षभरात आम्ही तिकडे गेलो. सासरीही सुमनला सदैव कामानेच व्याढलेले. तिला असं सतत काम करताना बघुन खुप वाईट वाटायचं पण आम्हा लहानाचं कोण ऎकणार म्हणुन गप्प असायचो. सासुचे सासर्‍याचे नवरयाचे करत राहिली. वर्षभरात पाळणा हललाही आणि मुलगी झाली. मुलगी झाली म्हणुन आत्तेच्या चेहर्‍यातली नाराजी तेव्हा लपली नाही. पण आता नाहीतर नंतरतरी मुलगा होईल ह्या आशेवर होती . परत दोन वर्षानी मुलगीच झाल्यावर मात्र सुमनचे तिकडे हाल होऊ लागले. सासुला नातवाचा हव्यास त्यात तिचा नवरा लग्नानंतरही सुधारला नाही. तिला मारहाण करत होता पण आमच्या कानावर त्यावेळी कधी पोचायचे नाही, एकदा समजले तेव्हा बाबा बाभळेश्वरला जाऊन आत्याला आणि आत्तेभावाला चांगलेच समजावुन आले होते. काकाला कधी पोरीची काळजी वाटली नाही. पोटची पोर म्हणुन एकदा तिला माहेरी आणली पण नातेवाईकात बोलणी सुरु झाल्यावर परत सासरी पाठवली. सुमनच्या नशीबी हाल कमी होण्याच्या मार्गावर नव्हते. दुसर्‍या मुलींनतरही सुमन दोन वर्षानी तिसर्‍यांदा बाळंत झाली. पण ह्या वेळी तिच्या बाळंतपणात कुणी काळजी घेतली नाही. माहेरी काकू एकटीच असल्याने तिची सगळी बाळतंपणं सासरीच झाली. आम्ही मुंबईत आणु म्हटलं तर एवढ्या लांब नको म्हणुन आत्तेची परवानगी नव्हती. तिसर्‍या बाळतंपणातही तीच्याकडुन घरची, शेतावरची सगळी कामे करुन घेत राहीले. नवर्‍याची साथ कधी लाभली नाही. दु:ख, यातना सहन करत राहिली. डिलीव्हरीच्या वेळी मात्र ह्या सगळ्या फरफट्यातुन सुटली. कायमची. देवाने तिची सुटका केली तिला आपल्याकडे बोलावुन. ह्यावेळीही तिला मुलगीच झाली. मु्लीला जन्म दिला पण सुमन जीवंत राहिली नाही. ह्या मुलीला तिच्या सासर्‍यांनी आपलेसे केले नाही. काकांच्या मोठ्या सुनेने तिला आपल्याकडे ठेवली. आज तिला मुलीसारखी संभाळतही आहे. वहिनीला दोन मुले आहेत पण मुलगी नव्हती.

सुमनच्या जाण्याची बातमी कळाल्यावर खुप त्रास झाला रात्र रडुन काढली पण त्याचा काही उपयोग नव्हता. आम्हा भावंडावर तिने केलेली माया अफाट होती. आमच्या चेहर्‍याकडे बघुन तिला आमच्या भुकेचा अंदाज यायचा. "देऊ का काही खायला..?" असा तिने विचारलेला मायाळु प्रश्न आजही आठवतो. तिला जाऊन दहा-बारा वर्षे झाली असतील. पण आजही माझ्या शरिरातील एक कोपरा तिच्या हातची चटणी खाण्यासाठी उपाशीच आहे असे वाटते.

Oct 21, 2009

सारखं छातीत दुखतंय..

अशोक सराफांना एकदा लाईव्ह पहायची खुप इच्छा होती. सिनेमात कुठल्याही प्रकारचा अभिनयात लिलया वावरणारा हा बहुरुपी कलाकार माझ्या लहानपणापासुन खुप आवडीचा. त्याचे ’धुमधडाका’, ’गंमत जंमत’, ’ अशीही बनवाबनवी’ पासुन हल्लीच आलेला ’शुभमंगल सावधान’ पर्यंत बरेच चित्रपट मी पुन्हा पुन्हा पाहतो. नुसत्या चेहऱ्यावरच्या हालचालीने प्रेक्षकाला तो हसवु शकतो. विनोदाचा धुमाकुळ घालणाऱ्या चित्रपटांचं जसं त्याच्या चाहत्यांनी स्वागत केलं तसंच गभींर भुमीका केलेल्या ‘तू सुखकर्ता’ ’वजीर’ आणि ’एक उनाड दिवस’ सारख्या चित्रपटानांही मनापासुन पसंद केलं.


तर ’सारखं छातीत दुखतंय’ हे नाटक काल पाहिलं. थियेटरमध्ये जाऊन नाटक, सिनेमा पाहण्याचा योग तसा फार कमीच येतो. पण काल भाऊबीजेच्या सुट्टीनिमीत्त जुळुन आला (आणला म्हणा हवं तर..). नाटक आवडलं. ’अशोक सराफ’च्या ऎन्ट्रीलाच हात टाळी वाजवायला लागले. हे दोन अंकी नाटक फुलटु धमाल आहे. नाटकाचा विषय तसा आधी चित्रपटातुन येऊन गेलेला असला तरी ’संजय मोने’, ’अशोक सराफ’,’निवेदीता सराफ’, ’राजन भीसे’ आणि हास्यकल्लोळ माजवणारा ’विनय येडेकर’ यांच्या अभिनयात सुंदर साकारला आहे. ’विनय येडेकर’ने अफलातुन काम केले आहे. त्याचा सुरुवातीचा प्रसंग एवढा विनोदनिर्मीती करतो की पुढच्या त्याच्या सगळ्या नुसत्या ऎण्ट्रीला प्रेक्षक हसुन दाद देतात. अशोक सराफ तर कहरच. ते फार नाटकात काम करीत नाहीत. मागे ’मनोमिलन’ नाटक करत होते. पण ते पाहण्याचा योग आला नाही. नाटक तसं जुनं झालं. बरेचसे प्रयोग झाले आहे. पण अजुन ज्यांनी पाहिले नाही अश्या अशोक सराफांच्या चाहत्यांना खरचं ही मेजवानी आहे. लिहिण्याचा उद्देश नाटक समिक्षण म्हणुन नाही (त्यातंलं आपल्याला काही कळत नाही.)पण बऱ्याच दिवसाची इच्छा पुर्ण झाली. अशोक सराफांना लाईव्ह अनुभवलं. बस्स! :-)








चित्रे महाजालावरुन साभार

May 28, 2009

सरप्राईज

"चल ऊठ चार वाजले. ऊठतोयेस ना?" आईच्या आवाजाने झोपेला झटकुन ऊठुन बसलो घड्यळ्यात पाहिले तर चार वाजुन गेले होते. ज्यासाठी दादर स्टेशनला जायचे आहे तोच विचार मनात. आई मला उठवुन परत झोपली मीच सांगितले तसे. 6.30 ची गाडी आहे लवकर पोहचायला हवे हे मनातच बोलुन फटाफट आंघोळ वगैरे आटपुन तयार झालो.. घड्याळ्यात पावणेपाच. चहा बनवला दुध टाकायला गेलो तर दुध नासलेले. चहा तसाच बेसीन मध्ये ओतुन चहाची तहान पाण्यावर भागवुन बाहेर पडलो.

बिल्डींगमधुन बाहेर पडलो तेव्हा दुध पोहचवणाऱ्या पोरांची धावपळ चालु होती. शेजारच्या बिल्डींगखाली पारिजातकाचे झाड आहे काही सेंकद तिथे घुटमळलो. प्राजक्तांचा सुंगध छातीत भरभरुन घेतला. स्टेशनरोडला लागलो. मनात परत तोच विचार चालु. वेळेवर पोहचायला हवे. स्टेशन अगदी जवळ म्हणुन एक बरं.घड्याळ्यात पाच वाजलेले. पास कालच संपल्यामुळे टिकीट काढणे गरजेचे. एवढ्या सकाळी कुठे टी.सी. टिकीटसाठी पकडणार हा विचार एकदा मनात डोकावुन गेला पण उगाच रिस्क कशाला आणि आधीच उशीर झालाय त्यात पुन्हा त्रास नको म्हणून टिकीटघरात गेलो. पाच सहा माणसे रांगेत उभी होती. काही भिकारी मुले टिकीटघरात झोपलेली बरोबर पंख्याच्या खाली. रांगेतली माणसे गावाला वगैरे जाणारी असावीत भरपुर सामान होते त्यांच्याजवळ. रांगेतल्याच एका बाईच्या खांद्यावर लहान बाळ होते झोपेतच ते आपले नाक चोळी. माझ्या पुढची रांग संपल्यावर टिकीटकांउटर वर मी "दादर सिंगल" टिकीट घेतली. टिकीट हातात मिळाल्यावर पळायला लागलो तर "अरे भाई छुट्टा.." असा मागुन टिकीट देणाऱ्याचा आवाज. सुट्टे पैसे घेण्याचे विसरलो म्हणुन परत पाठी. पैसे घेऊन प्लॅटफॉर्म च्या जिन्याकडे धाव घेतली. धावत जिना चढुन उतरुन प्लॅटफॉर्मवर आलो. ईंडीकेटर बंद. प्लॅटफॉर्मवर मोजकीच माणसे. एका बाकड्यावर बसलो. मागच्याबाजुला एक माणुस झोपलेला शांत. घड्याळात पाच दहा. गाडी येण्याऱ्या दिशेने डोळे लावले. चहाची आठवण आली म्हणुन स्टॉलकडे जायला निघालो तर स्टॉल बंद.परत बाकड्यावर बैठक मारली.

पाच पंधरा. वीस.. पंचवीस.. गाडी आली. एकदम घुसलो रिकामी होती. मधल्या जागेवर कोणीही उभे नव्हते म्हणजे तशी रिकामीच. दरवाज्यावर एक फुलवाली गजरे बनवत होती. चुकुन लेडीज डब्बा तर नाही. इकडे तिकडे बघीतले खात्री झाली तेव्हा हायसं वाटलं. दरवाज्यावर उभा राहिलो. काळोख तर होताच. मनात तोच विचार आधीचा. पहिले स्टेशन आले कुणी उतरले नाही. दोन तिनजण चढले. गाडी पुन्हा सुरु झाली. दरवाज्यावर कंटाळलो म्हणुन आतमध्ये सिटवर येऊन बसलो. तिसरी सीट मिळाली. बाजुच्या दोन्ही सिटवर दोन जण आडवे झालेले. माझ्या सिटवर समोर तिघेजण. दोघे झोपतच असावेत. डोळे बंद पण डुलत होते. नाग डोलतो तसा. समोरचा जागा पण लक्ष खीडकीबाहेर.माझ्या बाजुला बसलेले गृहस्थ तोंड उघडे ठेवुन झोपलेले. खिडकीजवळचा मुलगा खिडकीवर हात टेकुन बाहेर बघण्यात मग्न. पाठी एका दोघांची कुजबुज चालु होती मंद आवाजात. डब्बा कमालीचा शांत. अश्या कमीत कमीत गर्दी असलेल्या लोकलच्या प्रवासाची सवय फार नाही म्हणुन जरा निराळे वाटत होते. एकदा घड्याळ पाहिले बापरे पावणे सहा. दादर पोहचायला अजुन १० - १५ मिनीटे लागणारच. डोळे बंद केले. मागचाच विचार मनात आला. डोळे उघडले खीडकीतुन बघितले कुर्ला स्टेशन अजुन दहा मिनीटे. गाडीत माणसे वाढली. परत डोळे बंद केले. आळस आला जोरात जांभई दिली. तेवढ्यात बाजुच्या सीटवर आडवे झालेल्यापैकी एकजण कुस बदलण्याच्या नादात खाली पडला. स्वत:शीच हसतच मग सीटवर बसला. माझ्या समोरच्याने त्याच्याकडे पाहुन नंतर माझ्याकडे पाहिले आणि हलकेच हसला मीही स्मित केले. पडलेला बसला तेव्हा त्याच्या बाजुला अजुन दोघेजण जे आधी दरवाच्याच्या कोपऱ्यात उभे होते ते येऊन बसले. सायन गेले होते गाडी मांटुग्याच्या दिशेने. मी तेव्हा दरवाज्यावर येऊन उभा राहिलो. माटुंगा आले. गाडी माटुंग्याला बराच वेळ उभी सिग्नल असावा. तीन चार मिनीटानंतर सुरु झाली. घड्याळ्यात सहा वाजुन गेलेले. पटकन दादर आले.

दादरला उतरुन प्लॅटफॉर्म सहाच्या दिशेने पाहिले. प्लॅटफॉर्मवर गाडी लागलेली नव्हती. जिना चढुन प्लॅटफॉर्म नं ६ ला उतरलो.एकाला गाडीबद्दल विचारले त्याने तोही त्याच गाडीची वाट पाहतोय असे सांगितले. अनाउन्समेंट मध्येही गाडीबद्दल काही सांगत नव्हते. बहुतेक लेट असेल. नाहीतर कुठली मेल गाडी वेळेवर येते. पण १-२ तास तर लेट नाहीना होणार. सगळं मनाशीच. दादरचा तो प्लॅटफॉर्म माणसांनी फुललेला. थोडे उजाडायलाही लागलेले. घड्याळ्यात सहा पंधरा. आता गाडी यायला हवी. जरासा अस्वस्थ झालो. घड्याळ्याच्या काट्याबरोबर हृदयाचे ठोकेही साथ द्यायला लागलेले. डोळे गाडीच्या दिशेने काहीतरी चमकले गाडी आली वाटतं. हो आलीच. प्लटफॉर्मवरची माणसे पुढे सरसावाली. मीही त्यात. तेवढ्यात टुब पेटली. अरे फुल घ्यायचे विसरलो. ती उतरल्यावर तिला पहिले फुल द्यायचे मनाशीच ठरवले होते. कसा विसरलो. मगाशीच येताना ब्रिजवर फुलवाला बसलेला होता पटकन आठवले. जिन्याकडे पळालो. ब्रिजवर फुलवाला होता. "एक गुलाब दे" मी घाईत. त्याने लाल गुलाब हातात दिले. "अरे रेड नही यलो वो पिलावाला". लाल देऊन पिवळे घेतले. पैसे दिले.

परत प्लॅ्टफॉर्म सहा कडे पळ काढला झपाझप पायऱ्या उतरलो. गाडी तोपरर्यंत स्टेशनला लागलीच. ब्रेकचा करकचुन आवाज झाला. अनाउन्समेटं ’कृपया अपने तिकीट तथा पासेस निकालके...’ . माझे लक्ष गाडीकडे नंबर कूठला होता S-2. एक-एक डब्बा शोधत एस फोर . एस थ्री ..एस टु. मिळाला. तिन्ही दरवाज्यावर लक्ष. इथुन येईल का तिथुन. माणसे हळु हळु बाहेर पडत होती. सामान संभाळीत काहींचे डोळे जड काही उत्साहात. ही कुठे दिसत नाहिये. आजच येणार होती ना. तिच्या बहिणीकडुनतर सगळी माहिती काढलेली. डबा तर नाही चुकला. गाडी तर दुसरी नसेल. मनात शेकडो प्रश्नांनी गर्दी केली. हृदयाची धडधड गाडीच्या इंजीनाशी स्पर्धा करायला लागली. तेवढ्यात ती दिसली तीच का ही.. नाही नसेल. अरे हीच. केस का बारिक केले. मोठे केस किती छान होते. एक बॅग घेऊन बाजुला उभी राहिली गाडीकडे बघत. मी पुढे झालो. तिच्या पाठी गेलो "हाय..". तिने मागे वळुन बघितले. तिचे डोळे चमकले "अरे तु... वॉट अ सरप्राइज". मी तिला पुढे काही विचारणार आणि खिश्यातुन फुल काढुन देणारच तेवढ्यात "लीना.." गाडीच्या दिशेने तिला एक हाक आली. आम्ही दोघांनी तिकडे बघितले. माझ्याच वयाचा तरुण दोन्ही हातात सामान घेऊन उतरला. ही त्याच्या दिशेने गेली. त्याच्या एका हातातली एक भली मोठी बॅग हिने घेतली आणि माझ्याजवळ दोघेही आले. हाय वगैरे "कसा आहेस..कशी आहेस" झाले. "हा प्रशांत माझा क्लासमेट इथेच मुंबईला असतो." त्याची ओळख करुन दिली. ती थोडी लाजल्यासारखी हसली दोघांनी एकमेकांच्या डोळ्यात पाहिले. त्या दोघांना स्टेशनबाहेर टॅक्सीपर्यंत सोडले. "हा बोरीवलीलाच राहतो मला सोडेन नंतर जाईल पुढे म्हणुन घरुन कोणाला मला घ्यायला बोलावले नाही. तुही चल" तिने विचारले. मी "नको जा तुम्ही मी जरा घाईत आहे" म्हणालो. दोघांनी हातात हात घेतले. मी समजलो. समजुन स्वताशीच हसलो. टॅक्सीत बसल्यावर दोघांनी मला हात दाखवुन बाय केले. टॅक्सी निघाली. गुलाबाचे फुल तसेच खिश्यात होते. मी तिला सरप्राईज करायला आलो तिने मलाच केले होते.
-------------समाप्त-----------

Mar 13, 2009

युद्धावरील काही चित्रपट

सध्या एक भुत चढलं आहे युद्धावरील चित्रपट (वॉर मुव्हीज) पाहण्याचे. जे मिळतील चांगले असतिल ते पाहतोय. समिक्षण आणि परिक्षण मधले मला घंटा कळत नाही. तरीसुद्धा जे आवडले ते इथे मांडण्याचा केविलवाणा प्रयत्न करतोय.

सेव्हींग्ज प्रायव्हेट रायन(Saving Private Ryan) --
स्टीवन स्पीलबर्गचे अप्रतिम दिग्दर्शन ह्या चित्रपटाला टॉप वॉर चित्रपटाच्या पक्तींत बसवते. चित्रपट पाहताना आपणही चित्रपटातील एक आहोत आणि लढाई स्वत: डॊळ्याने पाहतोय असे भासते, चित्रपटातील सुरुवातीचा प्रसंग अगांवर काटा आणतो. एका आईची चारी मुले सैन्यात त्यातील तिघे वेगवेगळ्या ठिकाणी लढाईत मारले जातात. उरलेला एक (प्रायव्हेट रायन) तरी घरी सुखरुप पोहचावा म्हणुन त्याला शोधुन घरी पोहचवण्याची कामगीरी कॅप्टन जॉन मिलर( टॉम हॅंक्स) आणि कपंनीला दिली जाते. त्या शोधकार्याचे आणि ओढवलेल्या प्रसंगाचे यथार्थ चित्रण पाहवयास मिळते.

लेटर्स फ़्रॉम इवो जिमा(Letters from Iwo Jima) -
जपानमधील इवो जिमा एक बेट अमेरीकन सैन्याचा हातात जाऊ नये म्हणुन त्यांना रोखण्यासाठी आपली एक फ़ौज तिकडे पाठ्वते. तादामीची कुरुबायेशी(केन वॉटनेबी)ला त्या सैन्याची कमान दिली जाते. त्यातलाच एक युवा सैनीक सायगो लढाई संपल्यानंतर आपल्या नुकत्याच जन्मलेल्या मुलीला घरी जाऊन भेटण्याची आशा बाळागुन असतो. चित्रपटाच्या दुसर्‍या भागात जेव्हा अमेरिकन सैन्य आक्रमण करते. ग्रेनाईड आणि तोफांच्या मारांनी बेट अगदी पिजुन काढते. असल्या भयानक हल्ल्याने मरण आता जवळच आहे असे वाटले असताना सायगो ला जगण्याची जिद्द,साहस मिळु लागते. शेवटपर्यंत हा चित्रपट खीळवुन ठेवतो. तादामीची कुरुबायेशी चा अभिनय तर लाजवाबच. चित्रपट पाहिल्यानंतर बराच वेळ कानात ग्रेनाईडच्या धमाक्यांचा आणि जापनीज भाषेचा आवाज सतत घुमत राह्तो.

द हर्ट लॉकर(The Hurt Lokcer)-
सगळ्यात खतरनाक काम जीवंत बॉंम्ब रिफ्युज करायचे. सार्जंट विल्यम्स जेम्सचे हे आवडते काम. जेरेमी रेनर, एंथोनी मॅकी आणि ब्रायन गेरॅग्थी या सगळ्यांनी आपापली कामे चोख केली आहेत. दिग्दर्शन उत्तम आहे. बॉम्बशोधक पथकाचे काम किती जिकरीचे आणि थरकाप आणणारे आहे ते हा चित्रपट पाहिल्यावर कळते.

टनल्स रॅट(Tunnel Rats)-
भुयारातले उंदीर हाच अर्थ होतो आणि सैनीकांची हालत उदंरासारखीच होते हेच दाखवले आहे चित्रपटात. व्हियेतनाम मधील एका भागात भुयारात लपलेल्या व्हियेतनामी सैनीकांना शोधुन मारण्याचे काम करणारे अमेरिकन पथक. भुयारातले प्रसंग जबरदस्त हादरा देणारे आहेत. अभिनयाच्या बाबतीत ठिकच.

डिफायन्स(Defiance)-
दुसर्‍या महायुद्धात जर्मनने कब्जा केलेल्या बेलरशीया आणि पोलंडचा भागातील ज्यु लोकांना जीव वाचवण्यासाठी खोल जंगलात पळावे लागते. तीन बिलेस्की भाऊ त्यातला एक डॅनीयल क्रेग(कसिनो रॉयाल फेम). सगळी एकत्र येउन समुह बनवुन हळु हळु एक खेडे तयार होते. हा चित्रपट त्याग, आशा आणि जिद्दीचे उत्तम उदाहरण आहे. डॅनीयलचा अभिनय छान.

ऍपोकॅलॅप्स नाऊ(Apocalypse Now)-
अमेरिकन कॅप्टन विलार्डला एक ऑफीशियली "Does not exist - nor will it ever exist" असे एक मिशन दिले जाते. कर्नल वॉल्टर कर्ल्ट्झ आणि त्याचे सैन्य कंबोडियात सिमा पार करते. अमेरीकन सैन्यअधिकार्‍यांचा विश्वास की कर्नलची मानसिक स्थिती तिकडे जाऊन ढासळेली आहे तो पुर्णत: वेडा झालेला आहे. त्याला नेस्तनाबुत करण्यासाठी कॅप्टन विलार्डला नवख्या सहकार्‍यासोबत पाठ्वले जाते. पार्श्वभुमी व्हियेतनाम युद्धातली. तिथे पोहचल्यावर मात्र सगळे अनपेक्षीत आणि भयानक असते.

रॅंबो(Rambo)-
सिलेव्स्टर स्टॅलोन आपला आवडता ऍक्शन हिरो. रॅंबोचे आधिचे तिन्ही भाग आवडलेच पण हा जास्त आवडला. आता तो थायलंड मध्ये साप पकडायचे आणि बोटीने लोकांना नदिच्या पार पोहचवण्याचे आणि आणण्याचे काम करत शांतीने आपले आयुष्य जगत अस्तो. त्यात ख्रिस्ती ह्युमन राईट्स लोकांचा एक समुह बर्मा मधिल लोकांना औषधे आणि अन्न पुरवण्यासाठी तिथे येतो. थायलंड ते बर्मा हा प्रवास त्यांना रॅंबो च्या बोटीनेच आणि त्याच्या मदतीने करायचा असतो कारण रॅंबोशिवाय नदीला चांगला ओळखणारा दुसरा कोणीही नसतो. बर्माचा तो भाग गेल्या कित्येक वर्षापासुन युद्धाची झळ सोसत असतो. मेजर पा टी टींट तिकडची सगळी गावेन गावे उध्वस्त करतो. रॅंबो हा प्रस्ताव सुरुवातीला नाही नंतर हा करत तयार होतो आणि नंतर सुरु होतो रॅंबोपट.

ह्या व्यतिरिक्त "ब्लॅक हॉक डाउन", "३००","ग्लॅडीयेटर","द ग्रेट ऎस्केप","द डियर हंटर","फ़ुल मेटल जॅकेट" अशी भलीमोठी यादी आहे जे अजुन पहायचे आहेत. वेळ मिळेल तसे पाहता येतीलच. :)