Monday, January 12, 2009

पांडवकडा अन्‌ आम्ही..

कालच लोकसत्तेत "नायगरा फॉल्समधुन सुटका" ही लघुकथा वाचली आणि पांडवकड्यावर आलेल्या भयानक प्रसंगाची आठवण झाली.

चार वर्षापुर्वीची गोष्ट आहे. पावसाळ्यात कुठेतरी भटकंतीला जायचं हा आमचा मित्रमंडळीचा ठरलेला कार्यक्रम. माथेरान, लोणावळा अशी ठिकाण करुन कटांळा आला होता. वॉटरफॉलला जायचं हे नक्की ठरलेलं. त्यामुळे लोणावळ्याच्या किंवा खडवलीच्या कुठल्यातरी वॉटरफॉलला जाऊ असा वाद चालला असता एकाने खारघरच्या पांडवकड्याचे नाव सुचवले. आमच्यापैकी तिथे कुणी गेलं नव्हतं. ज्याने सुचवलं तो सुद्धा गेला नव्हता. लोणावळा पेक्षा खारघर हे मुंबईच्या खुप जवळ असल्याने आणि सकाळी जाऊन संध्याकाळी येऊ शकत असल्याने पाडंवकड्याला जायचे ह्या निर्णयावर सगळ्यांचे एकमत झाले. जायचे ठरल्यावर १०-१२ जण तयार झाले पण जायचा दिवस येईपर्यंत त्यातले आठ जण उरले. मी माझा चुलतभाऊ नितीन, रुपेश, संदिप साळकर, रणजीत कश्यप, सतीश पाटील, अनिल आणि निलेश असे एकुण आठ जण. वाशी स्टेशनला सगळ्यांनी सकाळी सात वाजता भेटायचे हे पक्के झाले. सात वाजता कुणी येणार नाही हे सगळ्यांना ठाऊक होते. वेळेवर यायचे नाही ह्या आमच्या मित्रपरिवारांच्या कायद्याला जागुन सगळे ९ वाजेपर्यंत जमा झाले. पावसाची रिपरिप सकाळपासुनच चालु झालेली. त्यादिवशी आभाळ सुद्धा काळेकट्ट ढगांनी भरुन आलेले. तिथुन ट्रेनने अर्ध्या तासात आम्ही खारघरला पोहचलो. आता तिथुन कसे जायचे हे कुणालाच माहिती नव्हते. खारघर स्टेशनला बाहेर पडल्यावर एका हॉटेलवाल्याला विचारले तर त्याने नाल्याला लागुन असलेल्या रस्त्याने जा असे सुचवले. त्या रस्त्याची काही माहिती आम्हाला नव्हती. पण काहीतरी ऍडव्हेंवचर करु असे वाटल्याने आम्ही तयार झालो. पुढे काही खायला मिळेल नाही मिळेल म्हणुन त्याच हॉटेलमध्ये पाव-भाजी, इडली सांबार खाऊन घेतले.

तोपर्यंत पावसाने चांगलाच जोर पकडलेला होता. तसल्या वातावरणाने आमचा हुरुप अजुनच वाढला. त्यावेळी खारघर आजच्याएवढे वसाहती आणि बिल्डंग्जने वेढलेले नव्हते. नुकताच तयार झालेला डांबरी रस्ता ओलांडुन आम्ही समोर दिसत असलेल्या डोंगराकडे पाहत चालत होतो. नाल्याच्या बरोबर सगळा लाल मातीचा खडकाळ रस्ता. पावसाने चांगलेच झोडपल्यामुळे सगळीकडे चिखल आणि पाणीच पाणी. सगळे चांगले भिजलेले शरिराच्या कोपऱ्या कोपऱ्यापर्यंत पाणी पोहचले होते. एकमेकांची थट्टा-मस्करी करत, पाणी आणि चिखल उडवत मस्तपैकी पुढच्या मिळणाऱ्या अनुभवांची जराही तमा न बाळगता चाललो होतो. मध्येच गवताळ भाग, एखादा पाण्याचा ओहोळ यायचा मग त्याला पार करायचं. ज्या नाल्याच्या बाजुने आम्ही जात होतो त्याच नाल्याला आता पार करुन जायचं होतं. नाला असला तरी पाणी घाणेरडे नव्हते. लालसर गढूळ पाणी. आमच्या अंगात उत्साह पराकोटीला पोहचला होता. आणि त्यात पोहणे फक्त दोघांना बऱ्यापैकी येत होते. कसाबसा एकमेकांच्या हाताला हात धरुन साखळी करत आम्ही तो नाला पार केला. पाणी कमरेपर्यंत असल्याने जास्त त्रास झाला नाही. पाण्याचा वेगही एवढा जास्त नव्हता. नाला पार करताच जरा पुढे गेल्यावर पांडवकड्याचा धबधब्याचा आवाज यायला लागला. ढग एकमेकांवर आपटल्यावर येतो तसा गडगडासारखा आवाज सतत येत होता. पुढे पुढे जात असल्याने तो वाढतच चाललेला होता. १५ मिनीटे पुढे चालत गेल्यावर तो अजस्त्र पांडवकडा आमच्या दृष्टीला पडला. किती मोठा होता तो आणि त्याचा येणार तो गडगडाटी आवाज त्यापेक्षाही भयानक. आमचा वॉटरफॉलला जाण्याचा अनुभव काही खास नव्हता. लोणावळ्याचे काही डॅंम आणि छोटेमोटे वॉटरफॉलमध्ये आम्ही भिजुन आलो होतो. पांडवकडा वॉटरफॉलमधुन येणाऱ्या पाण्यातुनच आम्ही चालत त्याच्याकडे पाहत चालत होतो. पावसाचा जोर कायम होता. लहान मोठे दगडी कडे पार करत त्यावर उड्या मारत आम्ही त्या अजस्त्र कड्याच्या पायथ्याशी पोहचलो.३०० फूटावरुन पडणारे पाणी त्या पाण्यात मनसोक्त भिजणारा तो सगळा यंग क्राउड पाहुन आमचा उत्साह आता शिगेला पोहचला होता. सगळ्यांनी पाण्यात उड्या टाकल्या. मला पोहता येत नव्हते तरी मी त्या पाण्यात उतरलो. पाण्याचा वेग आधी भेटलेल्या नाल्यापेक्षा भलताच जास्त होता. निलेश पोहण्यात तरबेज असल्याने तो ज्या ठिकाणी पाणी वॉटरफॉलचे पाणी पडत होते तिथे एक भला मोठा खड्डा तयार झाला होता त्यात सुर मारुन पोहत होता. आम्ही त्याला ओरडुन ओरडुन सांगत होतो की 'पाण्यात एखादा मोठा दगड असेल आणि पाण्यात सुर मारताना डोके आपटुन फुटेल'. तो काही ऎकत नव्हता. इथे दगड नाहिये असे सांगुन त्याचे पोहणे चालुच होते. आम्हाला जवळ असलेल्या कुणालाही काही बोलायचे असेल तर मोठ्याने बोलुन सांगावे लागायचे. त्या पडणाऱ्या पाण्याचा आवजाच एवढा जबरदस्त होता की कुणी काहिही बोलले तरी आवाजातले काही शब्द्च आमच्या कानी पडत होते. कधी पाण्याच्या प्रवाहाला पार कडुन तिकडे जायचे मग तिथुन परत इकडे. मध्येच नाचायचे एखाद्याला पाण्यात पुर्ण बुडवुन काढायचे असले प्रकार चालु होते. अचानक पावसाचा जोर वाढला एकीकडे पावसाचा सरींचा मारा त्याचा आवाज, कड्यावरुन पडणाऱ्या पाण्याचा आवाज, काळवंडुन आलेले आकाश त्यामुळे वातावरण जरा भयानक वाटु लागले. तिकडे आमच्या व्यतीरिक्त काही ग्रुप्स होते. काही मुले धाडस करुन कड्याच्या मध्यभागी असणाऱ्या एका लेणी सारख्या भागात चढुन गेलेले. तिकडे बियरच्या बाटल्या डोक्यावर ठेवुन नाचत होते. वेळ कसा निघुन जात होता ते कळाले नाही.

पावसाचा जोर काही कमी होत नव्हता. त्यात कड्यावरुन पडणाऱ्या पाण्याने वेग घेतला. काही समझदार लोकांनी सगळ्यांना तसे ओरडुनही सांगितले पण त्या पाण्यात खेळणाऱ्यांचे त्यांच्याकडे लक्ष नव्हते. नेमके त्याचवेळी नितिन, सतिश, रणजीत आणि मी असे चौघेजण प्रवाहाच्या त्या दिशेला होतो. आमच्याबरोबर दुसऱ्या ग्रुप्सचे पाच मुले होती. पाण्याचा वेग खुपच वाढलेला. प्रवाहात दिसणारे काही दगड आता दिसेनासे झाले होते. ज्या दगडावरुन आम्ही उड्या मारत विरुद्ध दिशेला आलो होतो तेच दगड पाण्यात संपुर्ण बुडाले होते. कोसळणारा पाउस आणि पाण्याचा गडगडाटी आवाज त्यात पाण्याचा प्रचंड वेग आता प्रसंग गंभीर झालेला आहे हे आमच्या लक्षात आले. पण आम्हाला हे कळुन उशीर झाला होता. अतिउत्साह आमचा जीव घेणार की काय. कारण पाण्याचा प्रवाह एवढा जोरात वाहत होता की आम्ही पाय टाकले तरी ते पाण्याच्या प्रवाहाने पुढे जात होते. सतिशने प्रयत्न करुन त्याप्रवाहात जवळ असलेल्या एका दगडावर उडी मारुन त्यावर पाय आखडुन बसला. आता हात-पाय थंडीने आणि भितीने थरथरायला लागले होते. इकडे नितीनने 'स्वामी वाचवा' असा मत्रं पूटपुटायला सुरुवात केली. प्रवाहाच्या सुरक्षीत ठिकाणी असणारे आमचे बाकिचे सहकारी आणि मुले आम्हाला ओरडुन काहीतरी सांगत होते पण आवाज कानापर्यंत पोहचत नव्हता. त्यांच्या हातवाऱ्याने एवढेच कळत होते की आम्ही एकमेकांचे हात पकडुन पाण्याचा प्रवाह पार करावा. सतिशच्या पाठी मी तो बसलेल्या दगडावर उडी मारली आणि माझा पाय त्या दगडावरुन निसटला. त्याक्षणी काही कळायचा आत मी सतिशला पकडले माझे पुर्ण शरिर आता पाण्यात होते आणि पाण्याचा मारा मला प्रवाहाच्या दिशेला ओढुन घेण्याचा प्रयत्न करत होता. मी शक्य तेवढी ताकद लावुन सतिशला पकडवुन ठेवले होते. पण माझा हात सुटणार तेवढ्यात सतिशने माझ्या दंडाला पकडुन वर खेचले. थोडा आधार मिळाल्यामुळे मी दगडाला घट्ट पकडत त्यावर घुडगे टेकुन बसलो. त्यावेळी सतिश नसता तर त्या पाण्याच्या प्रवाहात वाहत जाऊन कुठल्यातरी दगडाला आपटून माझा कपाळमोक्षच झाला असता. आम्ही प्रवाहाच्या त्या दिशेला जाऊन फार मोठी चुक केली होती. पावसाचा आणि वाहणाऱ्या पाण्याचा अंदाज आम्हाला घेता आला नव्हता. पावसाचा जोर कमी होणारा नव्हता आणि संध्याकाळही होत आलेली. उजेड आहे तोपर्यंतच प्रयत्न करणे शक्य होते. दगडावर बसलो तरी आम्हाला प्रवाहाच्या सगळे उभे असणाऱ्या सुरक्षित ठिकाणी कसे जायचे हा भलामोठा प्रश्न होताच. पाण्याच्या वेगापुढे आमची शक्ती फारच कमी पडली होती. प्रचंड वेगाने पाणी आपली ताकद जाणवुन देत होते. तिकडुन आमचे सहकारी 'हात पकडा' असे ओरडुन सांगत होते. तोपर्यंत त्यांनी तिकडे त्यांची साखळी तयार केली होती. हाताला हात धरुन ते पाण्यात पुढे आमच्या दिशेने येण्याचा प्रयत्न करत होते. मानवी साखळी करुनच त्यादिशेला जाण्याशिवाय काही पर्याय नव्हते. अन्य कुठेलेही साधन तिकडे नव्हते. त्यात रुपेश पुढे होता नंतर अनिल त्याच्या मागे दुसऱ्या ग्रुप्सची उंच मुले. आतापर्यंत एकमेकांकडे फक्त खुन्नसने बघणारी सर्व ग्रुप्स एकत्र आले होते.

एकीकडे रौद्रद्ररुप धारण केलेला पाण्याचा प्रवाह आणि दुसरीकडे मानवी शक्ती असा सामना सुरु होता. मी आणि सतिशने बाकिच्या उरलेल्यापैकी काहिंना आम्ही बसलेल्या दगडावर यायला सांगितले. तो दगड मोठा होता पण पाण्यामुळे त्याच्या आकाराचा अंदाज येत नव्हता. मी पायाने त्याचा अंदाज घेतला आणि रणजीत आणि नितीनला दगडावर येण्यासाठी हात पुढे केला. दगडावर येण्यासाठी उडी मारताना जराही पाय सटकला असता तर माणुस थेट खडकांच्या राशीत. रणजीत आल्यानंतर नितीनने उडी घेतली. तो सुद्धा सटकणार त्यात रणजीतने त्याला हात धरुन पकडले. नितिनचा स्वामी जप आता मोठमोठ्याने होत होता. अक्षरश: डोळे बंद करुन त्याने जोरात 'स्वामी स्वामी' अशी धाव सुरु केली. जे पाचजण उरले त्यांनी आधी तुम्ही चौघेजण आधी जा मग आम्ही येतो असे म्हणाले. ते योग्यच होते कारण आम्ही ज्या खडकावर बसलो होतो तो खडक नऊजणासाठी अपुरा होता. पुढे सतिश मागे मी माझ्या हाताला घट्ट धरुन नितिन नंतर रणजित त्या प्रवाहात पुढे सरकरण्याचा प्रयत्न करत होतो. समोर सुरक्षित स्थळी तयार झालेल्या साखळीमध्ये आणि आमच्यामध्ये चार-पाच फूटाचे अंतर. त्यात जर पुढे जाउन हात पकडला आणि तो सुटला तर सगळेच संपणार होते. आम्ही हाताची पक्कड घट्ट केली. एकदा आकाशात पाहुन घेतले. सतिश पुढे रुपेशच्या हाताच्या दिशेला झेपावला. नशिबाने त्यांची पक्कड घट्ट बसली. आम्ही पकडी अजुन घट्ट केल्या. रुपेशने सतिशला आपल्याकडे खेचायला सुरुवात केली. त्याचवेळी मी आणि नितीन पाण्यात जाता जाता वाचलो. सतिश सुरक्षित स्थळी पोहचला त्याच्यापाठोपाठ मी आणि नितिन रणजीत सगळी शक्ती पणाला लावुन पुढे सरकलो. नितिनचा पाण्यात तोल जाणार तोच रणजीतने परत एकदा नितिनला घट्ट पकडत माझ्या दिशेने ढकलले. मी त्याला जेवढे खेचता येईल तेवढे खेचले आणि त्याला आधार मिळताच आम्ही चौघेजण त्याठिकाणी पोहचलो. उरलेल्या पाच जणांना असेच काढण्यात आले. सुदैवाने आम्ही सगळेजण बचावलो होतो. एकजरी त्यात गेला असता तर आम्ही आयुष्यभर स्वत:ला माफ करु शकलो नसतो. आमच्याच उद्दामपणाचा, अतिउत्साहाचा राग आला होता.

..
दोन दिवसांनी न्युजपेपरमध्ये ’ खारघर येथील पांडवकडा धबधब्यात चेंबुरच्या एका कॉलेजच्या तिन मुलांचा पाण्याच्या प्रवाहात मृत्यु’ अशी बातमी वाचली. काळीज हादरले. निसर्गाच्या तडाख्यातुन आम्ही वाचलो पण त्यानंतर पांडवकड्याने त्यावर्षी ११ बळी घेतले. त्याच्या पुढच्याचवर्षी तिकडे पर्यटकांना जाण्यास रोखले जाऊ लागले. हल्ली दरवर्षी पावसाळ्यात पांडवकड्यावर पोलींसाचा पहारा असतो आणि ठळक अक्षरात पाटी झळकत असते "नो ऎण्ट्री".

2 comments:

Anonymous said...

Mastach...prasavarn khooop sunder ahe...tyatil likhanachi shaili ghadun gelelya tumchya anubhava dolyasamor ubha karun angavar shahara anato...asech lihit raha...ALL THE BEST.....- Rucha

साळसूद पाचोळा said...

आमच्याच उद्दामपणाचा, अतिउत्साहाचा राग आला होता."......
.. . सही लिहले आहेस ...

Post a Comment