Thursday, November 13, 2008

ती..

रविवार दुपारचे २.३० वाजले होते. पोटभर जेउन ढेकर देत गॅलरीत गेलो. मस्त ऊन पडले होते आता ताणुन द्यायचे असा विचार करत येउन बेडवर पडलो. हाताला लागलेला ‘मटा’ घेतला आणि वाचता वाचता झोप लागेल म्हणुन पाने चाळत होतो. डुलकी यायला लागल्यावरच बाजुच्या टेबलावरचा मोबाईल खणखणला. छ्या ! रविवारच्या दिवशी मोबाईल पण वाजु नये असे वाटते. नाईलाजाने घेतला सतिश चा कॉल होता.
"काय करतोस?" सतिश
"काही नाही रे पडलो होतो.. काय बोलतोस?"
"अरे मी आता मॉल मध्ये आहे."
"कुठल्या ?"
"सेंटरवन"
"बर मग?"
"अरे मला तुझी ही दिसली... सायली!"
"सायली ?"
"विसरलास! कॉलेजमधली तुझी चिमणी."
थोडे बोलल्यावर त्याने फोन ठेवला. मी परत बेडवर आडवा झालो.

सायली! एका झटक्यात मला सतिशने ६ वर्ष पाठी जाण्यास भाग पाडले. मग सगळं सटासट फ्लॅशबॅक्सारखे डोळ्यासमोर आलं. कॉलेजातले ते दिवस.

लास्ट ईयर ला होती माझ्या बरोबर. तसा आमच्या ग्रूप मधला 'महेश' तिच्या आधीपासुन पाठी होता. आणि त्याला आयडिया द्यायला आम्ही मी आणि सतिश. प्रोजेक्ट चे दिवस होते. कॉलेजमध्ये सगळीकडे धावपळ होती. मी महेश, सतिश आणि किशोर असे चौघानी मिळून 'इलेक्ट्रॅनीक पियानो' बनवला होता. सगळ्या कॉलेजमधली मुले मुली आपाआपल्या ग्रूप बरोबर प्रोजेक्टस बघत फिरत होती. महेश (आणि मी) फक्त 'ती' कधी येते त्याची वाट बघत होता. सतीश पुढे होता बोलबच्चन असल्यामुळे त्याला आम्ही पुढे उभे केले होते. आम्ही पाठी आरामात बसलो. तेवढ्यात 'त्यांच्या' ग्रुप आला. 'चिमण्यांचा ग्रुप' असे आम्ही त्यांच्या ग्रुपचे नामकरण केले होते. सारख्या चिवचिवत असायच्या म्हणुन. ति आज मस्त दिसत होती. पण नेहमी तशीच दिसायची सुंदर. कधी कधी वाटायचे हिला स्वतःला तरी माहित आहे का किती सुंदर आहे ती. साधारण ५.३ च्या आसपासची उंची. गोरी तर होतीच पण तिचे डोळे आणि केस मला फारच आवडायचे. आणि डोळ्यांची पापणी खाली करत जेव्हा कानावर आलेले केस डाव्या हाताच्या तिन बोटांनी पाठी करायची तेव्हा तर मी खल्लासच. त्यांचा ग्रूप समोर आला आणि तेवढ्यात सतिश कुठेतरी सटकला. प्रोजेक्ट समोर कोणीच नाही. मी महेश कडे बघीतले तर तो आपला आरामात केसावर हात फिरवून त्यांच्याकडे बघून स्टायलीशपणा करत होता. किशोर कसला येणार असा विचार करुन मीच पुढे झालो. त्यांच्या गृप मधल्या एकीने विचारले 'काय आहे पियानो का? वाजतो का?' मी "हो" म्हणालो. आणि बाकिची माहिती सांगितली. थोडा अडखळत होतो. "छान" ग्रेट" असे काहीस पुटपुटत त्या मुलींचा ग्रुप पुढच्या प्रोजेक्ट कडे वळला. मी एक सुस्कारा सोडला. अरे पण ह्या सगळ्यात माझे तिच्याकडे लक्ष का गेले नाही? का ती एवढ्या जवळ होती म्हणुन माझी हिम्मत झाली नाही.? जाउदे.

मला ती आवडते हे फक्त सतिशला माहित होते. आणि खुप साऱ्या शपथा देऊन मी हे कोंणालाही सांगु नकोस असे नेहमी त्याला सांगत असे. महेश ला पण 'ती' आवडायची पण त्याची गाडी एका रुळावर जास्त वेळ राहणार नाहे हे आम्हाला ठाउक होते. दिवस असे जात होते. क्लास चालु असताना तिच्याकडेच बघणे, समोर आली तर नकळत नजरानजर असे सगळे व्यवस्थित चालु होतं. पण तिला फक्त बघुन काहीच होणार नाही हे सतिश मला दिवसातून पन्नास वेळा तरी ऎकवत होता. मी तरी काय करणार मी पुढाकार घेउन तिला विचारावे तिच्याशी मैत्री वगैरे करावे असे मला मनातुन खुप वाटायचे पण प्रत्यक्षात मला जमलेच नसते.

टर्मीनल एक्झॅम्स झाल्या. महेश बहिणीच्या लग्नासाठी ८ दिवस रजेवर होता. "हिच वेळ आहे" सतिश मला सांगत होता. " ती त्या पार्कातल्या स्टॉपवर जाते ना कॉलेज सुटल्यावर?" . "हो रे च्यायला पण सगळी गॅंग असते ना तिकडे" मी म्हणालो. "असुदे ना तु जाउन फक्त लेक्चरविषयी बोल काहीतरी" सतिश हात झटकत म्हणाला. " काहीतरी म्हणजे काय?." माझा प्रश्न. "काही पण ! अरे GFC ची टेस्ट घेणार आहे ना तो मद्रासी, त्याबद्दल काहीतरी विचार." . " बघु मी ट्राय करतो". असे म्हणुन आम्ही क्लास मध्ये शिरलो. घडाळ्यात कधी २ वाजताहेत ह्याची वाट बघत होतो. कॉलेज सुटल्यावर सतिश आणि मी बाहेर येऊन थांबलो. चिमण्या गेल्या की त्यांच्या पाठी जायचे असे ठरले.त्यांचा ग्रूप निघताना दिसला. मग त्यांच्या पाठी ५०-६० मिटर अंतर ठेवुन आम्ही चालु लागलो. मेन रोडवर आल्यावर काही चिमण्यांनी आपला मोर्चा डाविकडे वळवला. आता फक्त "ती" आणि तिची एक मैत्री अश्या दोघीच होत्या आणि आम्ही दोघे त्यांच्या पाठी. रस्त्यावर बरीच गर्दी असल्यामुळे काही वाटले नाही. पण पुढे जेव्हा पार्कातला सिग्नल आला तेव्हा कॉलेजमधले केवळ त्या दोघी आणि आम्ही दोघेच उरलो होतो. "आज काही जरी झालं तरी हा चान्स सोडुन नकोस, बोलायला तरी लाग पुढे बघ हळू हळू" सतीश हसत हसत मला सांगत होता. इथे माझ्या पोटात भुकेमुळे पडलेला खड्डा अजुनच वाढला होता. सतिश बोलत होता ते पण खर होत वर्ष झाले तरी मी तिच्याकडेच फक्त बघत होतो. बोलणार कधी निदान मैत्री तरी. मनाशी पक्का निर्णय केला. तेवढ्यात सतिश ने बॉंब टाकला. "मी जातो. अरे तीच्याबरोबर आहे ना ती डावखरे तीला माहित आहे मी कूठे राहतो ते". "मग?" मी त्याच्याकडे बघत म्हणालो. " अरे तिला संशय नाही का येणार तुझ्याबरोबर आलो ते?" सतिश. " कसला संशय? असा तु माझ्या बरोबर येऊ शकतोस." मी त्याला सांगण्याचा खुप प्रयत्न केला पण त्याने काही ऎकले नाही. मला खुप सारे डोस देऊन तो सटकला. त्याचे जाण्याचे कारण वेगळे होते मला माहित होते. माझा स्टॉप तोच असल्यामुळे मला तसा काही प्रॉब्लेम नव्हता. सतिश गेल्यानंतर माझी हवाच गेली. आता शक्यच नाही असे स्वत:शीच म्हणुन मी "ति"च्या पाठी स्टॉपवर उभा राहिलो. तेवढ्यात तिच्या बरोबरच्या चिमणीची बस आली. ति त्यात बसुन तिला 'बाय' करुन गेली. आता स्टॉपवर आमच्या व्यतिरिक्त फक्त दोघे तीघेच होते. ते ही गेले. मी आणि ती फक्त, मला काय करावे तेच सुचत नव्हते. पायात मुंग्या जाव्या तसे काहीतरी होते होते. मनात धाडस करुया असे वाटत होते पण पाय तयारच होइना. बराच वेळ बस नाही म्हणुन ती पण वैतागली होती. वरुन उन मी मी म्हणत होते. मी दोन-तिनदा निश्चय केला पण फूकट. शेवटी काय झालं काय माहित मी तिच्या पाठून तिच्याजवळ गेलो. तोपर्यंत काय बोलायचे तेच विसरलो होतो. मी तिला पाठून "एक्सुज मी" असे म्हणनार तितक्यात तिच पाठी वळाली. "किती वाजले?" तिने विचारले. माझे सगळे अवयव छातीत आल्यासारखे वाटले. डाव्या हातातील घड्याळात बघून मी पटकन "दिड" असे म्हणालो. "काय?" तीने भुवया वर करुन मला विचारताच पाठून तिची बस आली. ती त्यात चढण्यासाठी पुढे गेली. मी तेवढ्यात परत एकदा घड्याळात बघितले तर अडिच वाजले होते. " सॉरी सॉरी अडिच" असे म्हटले तर ती बसमध्ये चढली होती. पण तिने ऎकले असावे कारण ती बसमधून जाताना हसताना मला दिसली. माझे अवसानच गळाले. कित्येक वेळ मी स्टॉपवरच होतो. गाढवा तुला काहीच जमणार नाही. साधा टाईम नाही सांगता आला तुला. थु.!

दुसऱ्या दिवशी सतिश नेहमीच्या कॉर्नर ला उभा होता. "बोललास?" सतिशने प्रश्नार्थक चेहऱ्याने विचारले. घडलेले सगळे त्याला सांगितल्यावर हसत सुटला. "शी साल्या तु पण फट्टु आहेस. तीने स्वतःहुन सुरुवात केली होती यार.. तु काहीतरी बोलुन सुरु करायचे ना?" . हे 'काहीतरी' म्हणजे काय? अश्या वेळी काय काय बोलायचे असे पुस्तक वगैरे असायला हवे होते. पुस्तक असले तरी मला जमले असते का? माझ्या क्लास मधल्या मुलींशी मी मस्त बोलायचो मस्करी वगैरे चालायची. पण ही समोर आली का सगळ सपाट.

पुढच्या दिवसात कधी चान्स आलाच नाही. तिचा क्लास वेगळा असल्यामुळे आम्ही फक्त कॉमन लेक्चर्स ला एका क्लास मध्ये असायचो. तिच्या बरोबरच्या एकाही मुलीशी आमची ओळख नव्हती. मीच तिच्यापासुन लांब राहयला लागलो. उगाच मला बघुन बावळट समजुन हसली आणि त्यांच्या ग्रुप मध्ये कळालं तर.. तिला बघणे मात्र चालु होते. काही दिवसानी महेश आला. मग त्याचे झोल देणे सुरु झाले. त्याला लग्नात एक आवडली आणि तिला पण तो आवडला असले काहीतरी. 'बर झालं ह्याचा रुळ चेंज झाला तो'. मला मनातुन बरे वाटले. पण ती कधी समोर आली तर त्याचे DDLJ मधल्या शाहरुख सारखे चाळे (केसावरुन हात फिरवणे, एक डोळा बारीक करुन त्याच्या भाषेतली 'शाहरुख स्माईल' ) करणे काही सोडले नव्हते. कॉलेजचे अखेरेचे दिवस जवळ यायला लागले. स्पोर्ट्स झाले, क्रिकेट्मध्ये मला 'बेस्ट फिल्डर' म्हणून मला प्राईज मिळाले.सतिश म्हणाला 'कसला फिल्डर एक मुलगी कॅच करता येत नाही तुला. कॉलेज च्या शेवटच्या दिवशी काही करुन तिच्याशी बोलणार आणि तिला सगळे सांगुन टाकणार असे मी स्वतःशीच ठाम ठरवले. मग ऎक्झॅम्स ची तयारी आणि प्रॅक्टीकल्स मध्ये गुंतुन गेलो. ठरवलेला दिवस आला. त्यादिवशी सगळेच कॉलेजमध्ये खुप वेळ थांबलेले. जाताना मी सतिशला सांगितले आज परत ट्राय करणार म्हणुन. "मीही तुला हेच सांगणार होतो. उद्यापासुन कुठे कोण भेटणार? सगळ सांगुन टाक आज..मी पण येतो तुझ्याबरोबर" सतिश असल्यामुळे मला जरा बरे वाटले. कॉर्नरला दोघे उभे होतो. चिमण्या आल्या आणि आम्ही पाठी चालायला सुरुवात केली. 'त्या' दिवसापेक्षा आज जास्त टेन्शन नव्हते. बाकिच्या मुली मेन रोड्वर वळाल्या. आज ती एकटीच होती. तिच्याबरोबर असलेली तिची मैत्रीण नव्हती बरोबर. वाह! आज सगळ जुळुन येतय असे वाटले.'उपरवाला भी तेरे साथ हे' सतिश म्हणाला. तो बरेच काही बोलत होता पण माझे काही त्याच्याकडे लक्ष नव्हते. मी काय बोलायचे हे सगळे आधीच ठरवलेलं.ति स्टॉपवर थांबली. आम्ही पण थोड्या अंतराने पाठी जावुन उभे राहिलो. स्टॊपवर गर्दी होती 'देवा हीची बस जरा लेट आली तर बरं होईल' अशी फक्त प्रार्थना चालु होती. नेहमीसारखीच सुंदर दिसत होती. निरागस चेहरा ही जर माझी झाली तर तिला समोर बसवुन तिच्या चेहऱ्याकडे पाहत बसेन अगदी न थकता.. मग सगळ जग गेल खड्यात'. सतिश चे "जाना ..जा" चालु होते. थोडी गर्दी कमी झाल्यावर मी पुढे झालो. छातीत धकधक का धडधड ते चालु झाले. तिच्या पाठी जवळ आलो आणि "एस्क्युज.." म्हणालो. ती माझ्याकडे वळाल्यावर ’धस्स’ झाले.खांद्या्रची बॅग परत सरळ करत माझ्याकडे कपाळावर आठी आणत बघायला लागली.
मी: हाय
ती काहीच बोलली नाही. मी माझे नाव सांगितले
ती: मग? (तोपर्यंत तिच्या कपाळावरच्या आठ्या वाढल्या)
मी: म..म..मैत्री करशील माझ्याशी ?
ती: अरे! त्यात काय मी ओळखते तुला..
मी: अच्छा..(मला दुसरे काही सुचलेच नाही)
ती: मग झाला का आभ्यास? प्रॅक्टीकल्स हार्ड गेले ना?
तिच्या कपाळावरच्या आठ्या नाहिश्या झाल्या होत्या. मला पण हलकं वाटायला लागल अचानक. ती बोलता बोलता मागे बस येते का ते पाहत होती.
मी: हो पण एवढे हार्ड नाही गेले. तुझा झाला अभ्यास?
ती : कसला होतोय? मोठ्या बहिणीचे लग्न ठरले आहे, घरात नुसती पाहुण्यांची गडबड चालु असते. चल बस आली. बाय..
तीची बस कधी आली ते मला कळालच नाही. माझी तिकडे लक्षच नव्हते. बसकडे काय माझी दुसरे कुणीकडे लक्ष नव्हते. ते एक दिन मिनीट मी आजुबाजुचे सगळं काही विसरलो होतो. तीने बसमध्ये चढल्यावर माझ्याकडे बघुन बाय करण्यासाठी हात दाखवला. मी पण बाय केले. हे सगळे एवढ्या लवकर झाले ते कळालेच नाही. तिकडुन सतिशने येऊन जोरात माझ्या पाठीवर मारले. त्याने आमचे संभाषण ऎकले होतेच 'शब्बास! क्या बात है.. अरे पण ति कुठे राहते ते तरी विचारायचे?" अरे हा माझ्या लक्षात आले आजच्या नंतर आम्ही कधी भेटणारच नव्हतो."ओह शीट" मी डोक्यावर हात मारला. एक्झॅम सेंटर तर वेगवेगळे असणार. मगा आता?
"अरे रिझल्ट च्या वेळी भेटेल ना तेव्हा तिचा कॉन्टक नंबर घेऊन ठेव." सतिश म्हणाला. "तोपर्यंत काय करायचे?" मला पडलेल्या प्रश्नाने सतिश ला पण निरुत्तर केले. पुढे एक्झॅम्स झाल्या. सतिश आणि मी १-२ वेळा भेटलो. रिझल्टच्या दिवशी ती आलिच नव्हती. तिच्याबरोबरच्या मुलींपैकी एक आली होती. सतिश ने माहिती काढायचा प्रयत्न केला पण काही हाती लागले नाही. आता कॉन्टॅक्ट होणार नाही हे मला कळुन चुकले. बराच वेळ मी सतिश कॉर्नरवर बसलो होतो. जर पहिल्याच वेळी मी तिच्याशी मैत्री बद्दल बोललो असतो तर आता आम्ही कॉन्टॅक्ट मध्ये असतो. कॉर्नरकडुन कॉलेजकडे जाणारा तो निर्जन रस्ता एकदम शांत होता. तो तसा बघुन मला अजुनच वाईट वाटलं. सतिश ला बाय करुन मी माझ्या रस्त्याला लागलो. ति कुठेतरी दिसेल म्हणुन काही दिवस मी त्या स्टॉपवर आणि ती जायची त्या बसने प्रवास केला. पण ती त्यानंतर कधीच दिसली नाही.

ह्या आठवणीत मला झोप कधी लागली ते कळालचं नाही. उठलो तेव्हा संध्याकळचे ६.३० वाजले होते. उठल्यावर पहिला गॅलरीत गेलो. बाहेर काळोख डोकावत आगमन करत होता.

(समाप्त)..

9 comments:

Unknown said...

gosht mast
mukhy mhnaje agadi vastvat nehun thevals..
pratyek vyaktichya ayushyat he ghadatch...tyamule punha 1da mi pan mazya bhut kalat gele

Mahendra Kulkarni said...

मस्त जमलाय लेख.. अरे काय लिहितोस तु? अगदी डोळ्यापुढे प्रसंग उभा केलास बघ. वाचतांना असं वाटलं की सगळं काही डोळ्यापुढे घडतय...
लिहिणे सुरु ठेव..
अजुन तुझे लिखाण वाचायला आवडेल..

Anonymous said...

BEST

Dipak said...

खूपच छान !!
कॉलेजचे दिवस आठवले .

sneha said...

khup chhaan......
.

akshu said...

ase kharaj jenvha ekhadya vyaktis hote na tenvha tyachya manache kai hot asel na.
kharach chaan aahe.

Anonymous said...

Very good story dear...
Prem he kharach asa asata..

तशीच मी said...

Tu pratyek character jivant kartos re !

Kavita said...

Khup chan .. mala majya 10th class chya crush chi athvn jali .. jvl pas sgl same story vatli .. Thank u for sharing

Post a Comment